नंदुरबार जिल्हा विशेष

देवमोगरा माता नंदुरबार(इंग्रजी-Nandurbar) भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खान्देश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे. १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि जिल्‍हयाची निर्मिती झाली. हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेले गाव आहे.या जिल्ह्याचे वर्गफळ ५०३५ किमी² आहे. लोकसंख्या १३११७०९ आहे, ज्यामध्ये १५.४५% शहरी आहे(२००१ प्रमाणे). नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर + खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत..

पर्यटनस्थळे

नंदुरबार ची शान, बाल क्रांतीकारकांच शहीद स्मारक

गांधीजीनी ९ ऑगस्ट १९४२ चले-जाव ची घोषणा दिली, त्या आंदोलन ला पाठींबा म्हणून नंदुरबार मध्ये इंग्रज सत्ते विरोधात मोर्चा काढण्यात आला, जुलमी इंग्रज सत्तेने बेशूट गोळीबार केला.
याच गोळीबारात अवघ्या १६ वर्षांचा शिरीषकुमार पुष्पेंद्र मेहता, १२ वर्षांचा धनसुखलाल गोरधनदास शहा, १४ वर्षांचा लालदास बुलाखीदास शहा, २० वर्षांचा शशिधर नीलकंठ केतकर आणि केवळ ८ वर्षांचा घनश्याम गुलाबचंद शहा हे पाचही बालके शहीद झाली ,याच बलिदानाची आठवण म्हणून जिथे गोळीबार झाला त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आल.

प्रकाशा (दक्षिण काशी)

नंदुरबार जिल्हातील शहादा तालुक्यात तापी नदीचा काठावर वसलेलं प्रकाशा हे एक तीर्थ-क्षेत्र. यालाच आपण दक्षिण काशी म्हणून प्रख्यात आहे. जितके महत्व उत्तर कशी ला आहे, तितकेच महत्व दक्षिण-काशी ला देखील आहे.

तोरणमाळ (महाराष्ट्रातील क्र.२ थंड हवेचे चे निसर्गरम्य ठिकाण)

एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण, यशवंत तलाव, सीता-खायी दरी, अतिशय हिरवेगार नैसर्गिक सोंदर्य, डोंगर, दऱ्या-खोऱ्या, धबधबे अशे अनेक वसुंधरेचे नटलेले तोरणमाळ.

सारंगखेडा, एकमुखी दत्त मंदिर

दत्त जयंतीला भरणारी खूप मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध, याच यात्रेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोडे बाजार भरत असतो. याच बाजारात देशाचा वेगवेळ्या ठिकाणहून घोडे विक्री साठी आणण्यात येत असतात. यात खूप मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत असते
याच यात्रेचा निम्मिताने अनेक लोकांना रोजगारासाठी एक व्यासपीठ मिळत असत.

सुर्यपुत्र शनी देवाचं एक महत्त्वपूर्ण स्थान

नंदुरबार तालुक्यात असलेले सूर्यपुत्र शनी देवाचे एक प्राचीन मंदिर आहे. साडेसाती चा त्रास होत असल्याने येथे दर्शन घ्यायला हवे अशी मान्यता आहे.

उनपदेव, गरमपाण्याचा झरा

नंदुरबार जिल्हातील उनपदेव हे तोरणमाळ सारखेच निसर्गरम्य ठिकाण सुंदर हिरवीगार डोंगरे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

रोकडमल हनुमानच एक भव्य मंदिर.

शहादा तालुक्यात उंटावद या गावी गोमाई नदीचा काठी असलेले रोकडमल हनुमानाचे प्राचीन व भव्य मंदिर, त्यात असलेली काचेची कलाकृती शोभनिय आहे.



महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन अस्तित्वात आला. सातपुड्याच्या डोंगरद-यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी वस्तीची सरमिसळ तेथे आहे. आदिवासींच्या बोली वेगवेगळ्या आहेत, तशीच त्यांची जीवनशैली वैविध्यपूर्ण आहे. लोकांची गुजराण शेती व जंगलसंपत्ती यांवर होते. औद्योगिक विकासाचे वारे तिकडे शिरलेले नसले, तरी आधुनिक जीवनशैलीने शिरकाव केला आहे. त्यामुळे तेथील आदिवासींच्या जगण्याची कुसही बदलत आहे.
नंदुरबार गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या चिमट्यात अडकलेला आहे. तो जिल्हा म्हणून 2000 च्या दशकात अस्तित्वात आला. जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुँवा आणि अक्राणी (धडगाव) असे सहा तालुके आहेत. ब्रिटिशकाळात निजाम स्टेटच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या रांगांपर्यंत पसरलेला भूभाग खानदेश म्हणून ओळखला जाई. प्रादेशिक वेगळेपण आणि कारभाराची सोय या करता खानदेशचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन विभाग केले गेले. पूर्व खानदेश (जळगाव, भुसावळ) हा काळ्या सुपीक मातीचा, तापीच्या खो-याचा भाग. कापूस-केळी यांकरता नावाजलेला. मुंबईला दूधपुरवठा करणारा. तो पश्चिम खानदेशच्या तुलनेत संपन्न, विकसित व पुढारलेला.
पश्चिम खानदेश (धुळे, नंदुरबार) क्षेत्रातील तापी नदीच्या खो-याचा भाग सोडला तर सारा भाग डोंगराळ आणि मध्यम प्रतीच्या मातीचा. सातपुड्याचा भाग वगळला तर पावसाचे प्रमाण अल्प. आदिवासींचे बाहुल्य. गुजर पाटील, कुणबी पाटील, रजपूत, परदेशी, धनगर अशा अठरापगड जाती वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या आहेत.
कोकण आणि देश यांना वेगवेगळे करणारा आणि दक्षिण भारताच्या हवामानाला वेगळा आयाम देणारा, कन्याकुमारीपर्यंत पसरलेला सह्याद्री, त्याचा पसारा उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यात, आडव्या आलेल्या तापी नदीच्या दक्षिण तटाशी आवरता घेतो. तापी पूर्व-पश्चिम वाहते. तिच्या उत्तरेकडे नदीला समांतर सातपुड्याचा पर्वत. पलीकडे, महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची सीमारेषा नर्मदा नदी निश्चित करते. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी जिल्ह्याच्या मध्यावर पाचरीसारखा आत घुसला आहे गुजरातचा भूभाग. महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमारेषेवर असणा-या  तापीवरील उकाई धरणाचा जलाशय गुजरातच्या प्रदेशात आहे. उकाई धरणामुळे गुजरातमधील बलसाड व सुरत या दोन जिल्ह्यांत हजारो एकरांचा संपन्न ‘शुगर बेल्ट’ अस्तित्वात आला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार या क्षेत्रातील आदिवासी मजुर दरसाल गुजरातमध्ये ‘जगायला’ स्थलांतरित होतात. सरदार सरोवर धरणाची निर्मितीही महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवर आहे. सातपुड्याच्या कठीण प्रस्तरातून वाहणारी नर्मदा एका जागी इतकी अरुंद आणि खोल झाली आहे, की हरणे नदीच्या खाईवरून उडी मारून पलीकडे जात. सरदार सरोवराच्या जलाशय क्षेत्रातूनही हजारो आदिवासींना विस्थापित व्हावे लागले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख शहर नंदुरबार हे मात्र सपाटीवर आहे. अर्थात सातपुड्याच्या व सह्याद्रीच्या डोंगरटेकड्या जिल्हाभर पसरल्या आहेत, तशा त्या शहराभोवती आहेत. पूर्वी ते शहर भोवतालच्या टेकड्या मजबूत भिंतींनी जोडून किल्ल्यासारखे कोटाने सुरक्षित केलेले होते. नंदुरबार शहर मध्यप्रदेशमधून येऊन नाशिककडे जाणा-या उत्तर-दक्षिण मार्गावर आणि सुरतकडून निजाम स्टेटकडे जाणा-याय पश्चिम-पूर्व मार्गावर येते. त्यामुळे व्यापाराचे ते मुख्य केंद्र होते. ब्रिटिश सत्ता स्थिरावल्यावर दक्षिण गुजरातमधील सुरत आणि पूर्व खानदेशातील मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन भुसावळ यांना जोडणारी रेल्वेलाइन टाकली गेली. त्या तापी व्हॅली लाइनवरील नंदुरबार हे महत्त्वाचे स्टेशन. बलसाड, वापी, नवापूर, नंदुरबार ही खानदेशातील प्रमुख गावे त्या रेल्वेलाइनला येतात. सुरत परिसरातील पारशी व्यापारी मंडळी जशी मुंबईच्या दिशेने डहाणूकडे सरकली, तशीच ती तिकडेही आली. त्या लोकांनी ताडी, दारू, लाकूड इत्यादींच्या व्यापाराबरोबरे रेल्वे इंजिनात जळालेला कोळसा लिलावाने घेण्याचे पिढीजात अधिकार सांभाळले. त्यांच्यासोबत गुजराती मंडळीही खानदेशात पसरली. त्याचा खानदेशच्या संस्कृतीवर खोल परिणाम झाला आहे. धेडगुजरी हा शब्द खानदेशमधील भाषेवरून तयार झाला. त्यामुळे धेडगुजरी म्हणजे धेडाची भाषा मराठी आणि गुजराथी मंडळींची भाषा गुजरी. वास्तवात मात्र नंदुरबारच्या स्थानिक भाषेत अहिराणी, भिली, मराठी व गुजराथी आणि मध्यप्रदेशच्या सामीप्यामुळे हिंदी या सर्व भाषांचा सहभाग आहे. आदिवासींच्या भिलोरी भाषेप्रमाणेच अहिराणी भाषेलाही वेगळी लिपी नाही, परंतु अहिराणी भाषा मृदू आहे. मराठी वा संस्कृत भाषांतील उच्चाराला कठीण असलेल्या र, स, श यांसारख्या अक्षरांचे अहिराणी, भिलोरीत अपभ्रंशित मृदू रूप वापरले जाते. त्याचबरोबर त्या भाषांत बोलताना आवाजात चढउतार असणारी एक लय असते. त्यामुळे त्या भाषेला उपजत गोडवा लाभतो. ते वैशिष्ट्य भिलोरी भाषेत तर विशेष जाणवते. आदिवासींच्या भिलोरी भाषेतही पोटभाषा आहेत. सातपुड्यात डोगरी भिली, तर नवापूर परिसरातील मावची, पावरा भिलांची पावरी इत्यादी बोलीभाषा आहेत. वानगीदाखल एकच वाक्य तीन बोलीभाषांत येथे दिले आहे :
१. कोठली : तुमनी बगिचामा एक बारी फुल फुललो सो. ताय मला देसा का?
२. पावरी : तुमरा बगिसामाय एक हाजलो फुल सेतह छो. मेह आपहात के?
३. डोगरी : तुमा बगिसामे एक हाजलो फुल फुल्याहं. तो माहू आपाहा के?
ह्या वाक्यास आणखी एक सांस्कृतिक संदर्भ आहे. आदिवासी समाजात पूर्वी मुलाचा बाप मुलीला मागणी घालायला जायचा तेव्हा अशा अर्थाचे वाक्य वापरून येण्याचा हेतू तो सुचवत असे.
नंदुरबार जिल्ह्यात आणि पूर्वीच्या धुळे जिल्ह्यातही कोणा एकाच जातीचे वर्चस्व नव्हते आणि त्यातही उच्च मानल्या जाणाऱ्या जातींचे संख्याबळ कमीच होते. त्यामुळे अठरापगड जाती त्यांच्या त्यांच्या जाती, पोटजातींची भाषा, संस्कृती टिकवून गुण्यागोविंदाने नांदल्या. जाती-जातींमध्ये समानता होती असे म्हणता येणार नाही, पण शत्रुत्वाचा अभाव होता. नंदुरबार क्षेत्रात  वेगवेगळ्या धर्मांचा प्रभावही जाणवतो. हिंदू, मुस्लिम, जैन, महानुभावी, कबीरपंथी अशा विविध धर्मनिष्ठा असणारे समाजगट तेथे सहिष्णु वृत्तीने जगतात. तसेच, नाते हिंदू-मुस्लिम समाजगटांतही होते. नंदुरबार शहरात काही वर्षांपूर्वी एकच माध्यमिक शाळा होती आणि ती होती नगरपालिकेची. नंदुरबारच्या प्रसिद्ध दर्ग्याजवळ ती शाळा होती. शाळेमध्ये गुजराथी, मराठी आणि उर्दू या तिन्ही माध्यम भाषांचे विद्यार्थी होते. ते एकाच शाळेत एकमेकांचे वेगवेगळेपण गृहीत धरून एकत्र शिकत होते. आठवड्यातून एक दिवस शेवटच्या पीरियडला सुट्टी असायची. घंटा झाल्याबरोबर सर्व मुले (अठरापगड जातींची आणि जैन, मुस्लिम, हिंदू धर्माची) टेकडीवरील दर्ग्याकडे पळत सुटायची. मध्ये आडव्या येणा-याज नदीवरील बांधावरून पोरे जीव खाऊन धावायची. एक शिक्षक साखरफुटाणे घेऊन अगोदरच टेकडीवरील दर्ग्याशी पहिल्या येणा-याे पोरांचे स्वागत करण्यास तयार असायचे. पहिल्या काही मुलांना ओंजळीने आणि मागून येणा-याा पोरांना मुठीमुठीने साखरफुटाणे दिले जायचे. नंदुरबार गावाची प्रथाही तीच होती. दर्ग्याच्या दरसाल होणा-या जत्रेला जाणा-यांत हिंदूंचा भरणा मोठा असायचा. तर गणपती उत्सवात हजेरी लावण्याला आणि मिरवणुकीसमोर लेझीम खेळण्याला मुस्लिम वस्तादांच्या तालमीतील पठ्‌ठेही हजर होत असत. गेल्या दोन-तीन दशकांत मात्र त्यांच्या त्यांच्या धर्मनिष्ठा असलेल्या समाजगटांत एकमेकांबद्दल द्वेष, अविश्वास आणि दूरत्व वाढत गेले आहे; परंतु तरीही तेथील धर्मनिष्ठेला कडवेपणाचा, तिरस्काराचा गडद रंग नाही.
शिक्षण घेणा-यां ची संख्या वाढू लागल्यावर गुजराती लोकांचे श्रॉफ हायस्कूल आणि ब्राह्मण व सवर्ण जातींचे डी.आर. हायस्कूल, मुस्लिमांसाठी उर्दू अँग्लो हायस्कूल सुरू झाले. आदिवासी पोरांना शिक्षण देण्यासाठी आदिवासी समाज कार्यकर्ते नटावदकर, जनार्दन वळवी यांनीही शाळा व आश्रमशाळा सुरू केल्या. त्यांचे मोठ्या शिक्षणसंस्थांत रूपांतर झालेले आहे. एका शिक्षणसंस्थेचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. अक्कलकुँवा येथे ‘जामिया इस्लामिया ईशातूल उल्म’ या संस्थेने तीस वर्षांपूर्वी धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरसा सुरू केला. त्या संस्थेच्या विशाल परिसरात पंधरा हजारांवर तरुण-तरुणी आर्ट्‌स, सायन्स, आयटीआय, आयटी, युनानी मेडिकल, बीएड, डीएड अशा शिक्षणशाखांतील उच्च पदवीशिक्षण घेत आहेत. सर्वांना होस्टेल्सची उत्तम सोय आहे. शिक्षणाचे मिडियम उर्दू आणि मराठी आहे. संस्थेत मुस्लिम समाजातील विद्यार्थी जास्त असले तरी आदिवासी व इतर समाजगटांचे विद्यार्थी-विद्यार्थीही तेथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी पोळ्या करण्याचे यंत्र संस्थेने आणले आहे. अगदी अल्प काळात ते यंत्र पंचवीस हजार पोळ्या तयार करते. त्यावरून संस्थेच्या पसा-याची कल्पना येईल.
इतिहासपूर्वकालीन आदिवासी माणसांचे अस्तित्व या प्रदेशात होते असे दाखवणारे पुरावे प्रकाशा येथे उत्खननात सापडले आहेत. आदिवासी ते राजस्थानकडून आल्याचे सांगतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत भाट समाजाची माणसे त्या भागात राजस्थानातून दरसाल येत असत. आदिवासींचे पूर्वज त्या भागात कसे आले याबद्दल ते कथा सांगत. एका मोठ्या परातीत पाणी टाकून, त्यात धातूची तार ताणून तयार केलेल्या वाद्याला उभे करून त्याच्या घूं घूं ध्वनीच्या तालात भाट आदिवासींच्या पूर्वजांच्या कहाण्या सुरामध्ये गाऊन सांगत. भिल आदिवासींना पूज्य असलेल्या देवी मोगरा मातेचे स्थान गुजरातच्या सीमेवर आहे. देवीच्या दरसाल चैत्रात भरणा-या यात्रेला हजारो आदिवासी, बिगरआदिवासी कुटुंबे जातात. दोन-दोन दिवस लाइन लावून दर्शन घेतात. यात्रा अमावस्येला असल्याने पूर्वी मंदिराभोवतालच्या टेकड्यांमध्ये असंख्य चुली पेटत असत, तेव्हा भोवतालच्या जंगलावर असंख्य काजवे चमचमत असल्याचा भास होत असे. ब्रिटिश काळात आदिवासी राजा असलेल्या काठी गावाची होळी लोकांना आकर्षित करते. पूर्वापार चालत आलेली त्यांची वेषभूषा करून आलेले स्त्री-पुरुष विविध रंगांची बहार आणतात. भोंग-यार बाजार हे त्या भागाचे वैशिष्ट्य आहे. आदिवासी कुटुंबे यात्रांना बैलगाड्यांनी येऊन दोन-दोन दिवस मुक्काम करत. एकमेकांवर फिदा झालेल्या जोड्या यात्रेचा लाभ घेऊन पळून जात. कोणा तरी ओळखीच्या वा नातेवाइकांच्या घरात लपून राहत. पुरेसा अवधी सोबत काढून अशी जोडी घराकडे आली की दोन्हीकडचे नातेवाईक पंचमंडळींच्या साक्षीने, आपसात भांडण्याची हौस पुरी झाल्यावर दोघांचे लग्न लावून देत असत. त्या प्रथेला ‘झगडा मोडणं’ असे म्हटले जाई. आदिवासींच्या लग्नात आमंत्रणे देण्याची पद्धत नव्हती. ढोल वाजू लागला, की कोणीही यावे, नाचात सामील व्हावे, लग्नघर सधन असेल तर मध्येच बाजूला जाऊन पानाच्या द्रोणातून दोन घोट मोहाची होरो पोटात रिचवावी, परत नाचात सामील व्हावे.
आदिवासी ज्याला दिवाळी म्हणतात ते गावाच्या सोयीने होणारे, पंचांच्या निर्णयाने होणारे सामूहिक हॅपनिंग असते. ज्या गावात बहुसंख्य आदिवासी वस्ती आहे अशा गावात तो दिवस सामुहिक रीत्या साजरा केला जातो. त्या दिवशी बकरे कापून गावातील कुटुंबांना वाटे दिले जातात. गावात दिवाळी आहे असे समजल्यावर आठवडी बाजारात दुकाने मांडणारे विक्रेते गावात हजर होतात. गावात यात्राच भरते! जुगारवाली मंडळी अड्डे आडोशाला जमवतात. संध्याकाळी आदिवासी सोंगाड्या पार्टी येते आणि धेडगुजरी भाषेत करमणुकीचा कार्यक्रम सुरू होतो. स्त्री पार्ट कोवळे, मिसरूड न फुटलेले पोरगेच करते. आदिवासींत रोडाल्या नावाचा नाचत नाचत प्रेमगीते गाण्याचा किंवा गात गात नाचण्याचा प्रकार आहे. दोन सोंगाडे (स्त्री व पुरुष) एकमेकांसमोर, मधे काही अंतर सोडून उभे राहतात आणि आळीपाळीने प्रेमगीताचे एकेक कडवे म्हणतात. ध्रृवपदाला दोघे जवळ येऊन अत्यंत गतीने नाचतात. गावदिवाळीत केल्या जाणा-या सोंगाड्या पार्टीच्या कलापथकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये पुढे बसण्याचा मान स्त्रियांना दिला जातो. पुरुष मंडळी मागच्या बाजूला बसतात. उत्तररात्रीनंतर, स्त्रिया-मुले निघून गेल्यानंतर पुरुष जरा जास्त रसिक होतात. संवादांत आणि गाण्यांत चावटपणाचे प्रमाण वाढते. परंतु सर्वसाधारणपणे, गावदिवाळीचा तो कार्यक्रम लहानमोठ्या स्त्री-पुरुषांनी एकत्रितपणे सर्व दिवस मजा घेण्याचा असतो.
दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेली आणखी एक यात्रा म्हणजे सारंगखेड्याची दत्तात्रयाची यात्रा. त्या यात्रेला गुजरात, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रदेशांतून उत्तमोत्तम घोडे विकण्यास येतात. लाखाच्या वर किंमत देऊन घोडे विकत घेणारी गि-हाइकेही तेथे येतात. यात्रा दोन आठवडे चालते. मुंबई-पुण्याकडील लोकांचेही ते आकर्षण होत आहे. तापीच्या काठाचे श्रीप्रकाशा तीर्थस्थान हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या सीमेवरील उकाई धरणाचे बॅकवॉटर कवेत घेतलेल्या गुजरातची सीमा प्रकाशापासून दोन-तीन किलोमीटरवर पोचली आहे. नाशिकला जाणे जमले नाही तर त्या भागातील हिंदू मंडळी अस्थिविसर्जन करण्याला प्रकाशाला येतात.
आदिवासींच्या परंपरेत मात्र त्या स्थानाला विशेष महत्त्व नाही. आदिवासींच्या दृष्टीने मोगरामातेनंतर दुसरे पवित्र स्थान म्हणजे अस्तंभ्याचा डोंगर- ते सातपुड्यातील उंच शिखर. महाभारतातील चिरंजीवपद प्राप्त झालेला अश्वत्थामा त्या डोंगराच्या आसपास भटकत असतो आणि त्या दुर्गम अशा गडावर यात्रेसाठी आलेल्या, रस्ता चुकलेल्या वा भलत्याच वाटेला गेलेल्या यात्रेकरूंना तो सुरक्षित रस्ता दाखवतो, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. वणीच्या देवीला तेथून चालत जाणा-यांची संख्याही गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे.
लग्नाच्या वेळी लाऊडस्पीकर लावून सभोवताल दणाणून सोडण्याची आधुनिक पद्धत तेथेही पोचली आहे. लग्नाची घटिका मारुतीचे दर्शन घेऊन परतणारी नाचणारी पोरेपोरी ठरवतात. लग्नसमारंभात नाचणे हा अटळ असा कार्यक्रम असतो. त्यात स्थानिक वैशिष्ट्य आहे. हिंदी, गुजराथी वा मराठी पॉप्युलर गाणी स्पीकरवर लावली जातात, पण कॅसेट्‌सचा वा सीडीचा वापर करून नाही. बहुधा कोणातरी व्यावसायिक व सुमार आवाजाच्या स्थानिक गायकाला त्याच्या वाद्यवृंदासह कार्यक्रमाला आणले जाते. गायक पॉप्युलर हिंदी व गरब्याची गुजराथी गाणी म्हणतात. गाण्यामध्ये स्त्रीच्या आवाजातील ओळी गाण्यासाठी गायिका नसते. कोवळ्या आवाजाचा मर्दच बाईच्या आवाजात तशी गाणी म्हणतो. स्पीकर सिस्टिमवर सीडी लावण्यापेक्षा हा प्रकार महागडा आहे. पण एकूणच, लोक अजून लाइव्ह प्रोग्रॅम ऐकण्याला प्रेफरन्स देतात! लग्नाची गाणी परंपरागत चालत आलेली असतात हे खरे, परंतु ती गाणी पाठ केलेली नसतात आणि उत्स्फूर्त काव्यरचनाही नसते. असे म्हणता येईल, की परंपरेने चालत आलेल्या गाण्याच्या टेम्प्लेट्‌स असतात. लहान मुलांना रंगवण्याकरता पुस्तके असतात, त्यांतील रेखाचित्रांप्रमाणे गाण्यांचे ढाचे तयार असतात. गाणारी बाई त्यात वर्तमान वास्तवाचे रंग भरत जाते. मग ओळखीच्या, नात्यातील व्यक्तींना टोमणे मारणे, जुन्या घडलेल्या घटनांच्या आधारे टिंगल-टवाळी करणे असे तपशील त्यात भरले जातात. मैफल रात्रीच्या निवांत वेळी तासन् तास चालू राहते. आदिवासींमध्ये तर स्त्रियांना सामुहिक रीत्या गाणी म्हणण्याची उपजत आवड असते. चार बाया एकत्र आल्या, की त्यांचे दोन गट तयार होतात. प्रौढ बायांपैकी कोणी तरी गाणे म्हणण्याला सुरुवात करते. एका गटाने एक ओळ गायली की दुस-या गटाने तीच ओळ परत गायची. जोपर्यंत ती बाई गाण्याची पुढची लड सोडत नाही तोपर्यंत दोन्ही गटांत गायलेल्या ओळींचे आवर्तन सुरू राहते. एकच ओळ घोटून घोटून म्हटल्यामुळे लहान व तरुण वयांतील मुलींना ती गाणी आपोआप पाठ होतात.
आदिवासींच्या नाचात वापरले जाणारे ढोल वजनदार आणि मोठ्या आकाराचे असतात. ते ओझे गळ्यात घेऊन, एक चाळ वाजवत ढोलवाला सतत पावले टाकत असतो. ढोलाचा आवाज आला, की पोरेपोरी हळुहळू भोवती जमा होतात. पोरे, गडीमाणसे आधी नाचू लागतात, मग तारुण्याच्या सीमेवर असलेल्या मुली हळूच एकमेकांच्या पंजांत पंजे अडकावतात, खांद्याला खांदा भिडवून पावले टाकू लागतात. मग प्रौढ स्त्रियाही पुढे होतात. ढोलवाला, बासरीवाला, झांजवाला हा वाद्यवृंद मध्ये आणि भोवती पुढेमागे व रिंगणात गोलाकारात सरकणारे पोरापोरींचे लहान लहान गट. नवरात्रीचे नऊ दिवस गल्लोगल्लीत गरबा नाचणा-यांचा उत्साह दृश्य व श्रवणीय रूपांत जाणवतो. पुण्यामुंबईसारखे नाचांना धंदेवाईक रूप अजून तरी आलेले नाही, पण त्या बाबतीतही गुजरातचे अनुकरण होणार यात शंकेला जागा नाही. गरब्याप्रमाणे संक्रातीला पतंग उडवण्याचे वेड गुजरातमधून तेथे पोचलेलेच आहे.
जिल्ह्यातील लोकांच्या रोजच्या जेवणात मुख्य पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकर आणि भरपूर शेंगदाणा वापरलेली चटणी. चटणी बनवण्याच्या पद्धतीत भरपूर तेल आणि मुबलक तिखट यांचा वापर. मात्र जात कोठलीही असो, पाहुणे-रावळे आले की खिचडी पाहिजेच. सोबत पापड, कुरडया, सांडगे यांसारखे तळणाचे पदार्थही असायला हवेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला गल्लोगल्लीत उन्हात खाटली तिरकी ठेवून त्यावर शेवया बनवणा-या स्त्रिया नजरेत येतात. सणासुदीला पुरणपोळ्या, मांडे असणारच. मुस्लिमांमध्येही मटणाच्या रश्शाबरोबर मांडे खाण्याची पद्धत आहे. गुजरात जवळ असल्यामुळे आणि स्थानिक पातळीवर तूर, मूग, हरभरा यांचे उत्पादन असल्याने स्वयंपाकात बेसनाचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. तेथील हॉटेलांत सकाळच्या नाश्त्याला लोक शेव-खमणी (खमण ढोकळा) खातात. त्याशिवाय तेथील खास पदार्थ म्हणजे भजीपात्रा. पात्रा म्हणजे अळूची पाने वा अळूच्या वड्या. मात्र खानदेशातील अळूच्या वड्या कडक तळलेल्या असतात, त्यामुळे त्या भरपूर टिकतात. सामिष खाणारे लोक बकरे वा बोकड खाण्याऐवजी कोंबडी खाणे पसंत करतात. लोकांनी कोंबड्या खाणे चिकनगुनियाच्या भीतीमुळे काही महिने बंद केले होते, पण नंतर परत सर्व व्यवस्थित सुरू झाले.
आदिवासींच्या सणासुदींत मोहाच्‍या दारूला खास महत्त्व असते. तशी दारू खास भट्टी लावून नवसागर वा किक आणणारी इतर केमिकल्स न वापरता बनवून घेतली जाते. एकूणच, तेथील लोकांमध्ये, आदिवासींच्या सहवासामुळे म्हणा हवे तर, पिण्याचा शौक जास्त दिसतो. कदाचित प्रमाण जास्त नसेल; पण निदान दारू पिणे हे फारसे निषेधार्ह मानले जात नाही.
आदिवासींमध्ये पुरुषांचे वेष खास वेगळे नाहीत, मात्र पुरुषांनी दागिने घालणे हे समाजमान्य आहे. भिल समाजातील स्त्रिया साडीचे दोन तुकडे करून कमरेच्या खाली एक आणि वर डोके व छाती झाकण्याकरता एक अशी वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे वापरतात. पावरा स्त्रियांच्या पायांत, कानांत, गळ्यात वापरले जाणारे दागिने बहुधा चांदीचे असतात. बाकी ठाण्यातील वारली जमातीतील स्त्रियांना केसांची खास निगा राखून फुले माळण्याची हौस दिसते, तशी भिलांमध्ये नाही. खेड्यावर राहणा-या आदिवासीच्या घरामागे वाडी (किचन गार्डन) सर्रास पाहण्यास मिळते. तेथे मका, लिंबू यांसारखी झुडपे आणि वेगवेगळ्या शेंगांचे वेल लावले जातात, परंतु फुलांची झाडे क्वचित दिसतात. ठाण्यातील आदिवासी त्यांच्या घराच्या भिंती चित्रे काढून सुशोभित करतात, तीही परंपरा नंदुरबारात आढळत नाही. आदिवासींत स्त्री-पुरुषांतील नाते सवर्ण जातीतील नात्यापेक्षा अधिक समान आहे. गुजर समाजातही कुटुंबात स्त्रीला खास अधिकार परंपरेने दिले आहेत. शेतातील धान्य एकदा खळ्यातून घरी आले, की त्याची कशी विल्हेवाट लावायची यावर घरातील प्रमुख स्त्रीचा अधिकार असतो. घरातील प्रमुख स्त्री तिच्या लग्न झालेल्या मुलीकडे तिच्या मुलांपेक्षा जास्त झुकते माप देते, अशी तक्रार गुजर पुरुषमंडळींकडून ऐकू येते. मात्र तेथे गोचीदार परंपराही आहे. सासूनंतर घरातील मोठी सून तिच्या धाकट्या जावांवर अधिकार गाजवते. त्यामुळे कुटुंबातील धाकट्या भावाला मुलगी मिळणे कठीण होते. पण एकूणच, मध्यम व अठरा-पगड जातींत स्त्रियांना पुरेसे महत्त्व आणि अधिकार परंपरेने दिलेले असतात असे दिसते. हे सांस्कृतिक वास्तव व वेगळी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील लोकवस्ती मुख्यत: डोंगरद-यांतील गावपाड्यांत पसरलेली आहे. लोकवस्तीच्या केवळ अठरा-एकोणीस टक्के लोक शहरांत राहतात. त्यातही शहरांत राहणा-या  आदिवासींचे प्रमाण अगदीच अल्प आहे. मात्र आदिवासींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा काढण्याचा कार्यक्रम शासन अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल होत आहे. जिल्ह्यातील शिक्षितांचे प्रमाण आहे लोकसंख्येच्या सेहेचाळीस टक्के. आदिवासींमधील सुशिक्षितांचे प्रमाणही कमी नाही. सुशिक्षित आदिवासी स्तर आदिवासी संस्कृतीपासूनही अलग पडत चालला आहे. इतकेच नव्हे, तर मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात शिक्षण घेत असल्याने पदवीधर आणि नोकरी करणा-याच मुलींना योग्य वर न मिळण्याची समस्या भेडसावू लागली आहे.
नंदुरबार स्वतंत्र जिल्हा घोषित झाल्यापासून नंदुरबार शहर व जिल्हा यांचे रूप बदलत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, कलेक्टर ऑफिस, तहसिलदार ऑफिस, पोलिस कार्यालय यांच्या नवनव्या इमारती तेथे उभ्या राहिल्या आहेत. नंदुरबारमध्ये नवे शानदार नाट्यगृहही उभे राहिले आहे. रस्ते रुंदावले आहेत; चौकांत पुतळे उभे करून सुशोभित केले गेले आहेत. एकीकडे असे भौतिक बदल होत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे, आधुनिक जीवनप्रणालीच्या प्रसारामुळे निर्माण होत असलेल्या वाढत्या गरजा पु-या करण्यासाठी नोक-यांच्या अभावामुळे स्पर्धा व ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत. गावागावांत पोचलेल्या टीव्ही-व्हिडिओमुळे तरुण-तरुणींच्या भोवतालचे वास्तव बदललेले नाही, मात्र त्यांची स्वप्ने शहरी व सधन वर्गाची झाली आहेत; वाढत्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा यांच्या दबावामुळे वाढते नैराश्य आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही भयावह समस्या समाजाला भेडसावू लागली आहे. तेथील आदिवासी मात्र यापासून दूर आहेत. त्याचे कारण त्यांची अल्पसंतुष्टता असावी.
आदिवासींच्या अल्पसंतुष्टतेतून ते आळशी असल्याचा सर्वमान्य भ्रम पसरला. त्यामुळेच 'घरात दाणा तर भील उताणा' अशा म्हणी अस्तित्वात आल्या. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुके धरून लोकसभेचा मतदारसंघ होतो. विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. ते सर्व मतदारसंघ आदिवासींकरता राखीव आहेत. महाराष्ट्रातील एकूण आदिवासींचे नेतृत्व करणे तर वगळाच, पण त्या जिल्ह्यातील भिल, पावरा, कोकणी इत्यादी आदिवासींचे नेतृत्व करणारा कर्तबगार आदिवासी नेता लोकप्रतिनिधी झालेला नाही. वस्तुत: आदिवासी समाजात गावपातळीवर असलेल्या पंच पद्धतीतून लोकशाहीची बीजे रुजलेली आहेत; मात्र आदिवासीबाहुल्य असूनही पंचमंडळीशी नाते राखून त्यांचे स्वत:चे नेतृत्व टिकवण्याचे कसब आदिवासी नेत्यांनी अवगत केलेले नाही. जिल्ह्यातील आदिवासी नेते कोणा बिगरआदिवासी नेत्याचे बोट धरून चालणे पसंत करतात, असा गेल्या पाच-सहा दशकांचा दाखला आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत ही परिस्थिती बदलत आहे.
सातपुड्यात सागाचे लाकूड प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत होते. आंबा, मोह, चिंच, चारोळी यासारख्या वृक्षांच्या कंदमुळांपासून आदिवासींची अन्नाची गरज पूर्ण होत होतीच, पण शरीरास आवश्यक सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स मिळत असत. सध्या पहाडपट्टीत कुपोषित बालकांची समस्या भयावह रूपात सतावत आहे. आदिवासी समाजात शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करणारे भगत व वैदू असतात. वैदूंना जंगलातील वनस्पतींचा वडिलोपार्जित ज्ञानसाठा उपलब्ध आहे. ज्यांनी जगण्याचे साधन म्हणून वनखात्याची नोकरी पत्करली आहे अशा सरकारी कर्मचा-यांनी स्थानिक वनस्पतीपशुपक्षी यांचे परंपरागत ज्ञान असलेल्या स्थानिक लोकांचे सहकार्य घेतले, तर स्थानिक जनसमूह श्रीमंतीचे नाही पण सुखी सुरक्षित जीवन जगू शकतील. आदिवासी कुटुंबांना खासगी मालकीने जंगल राखण्याच्या अटीवर जंगल उत्पादने घेण्याची परवानगी दिली तर वनविकास होणे अवघड नाही. परंतु जंगलविकास करण्यात वनखात्यांच्या कर्मचा-यांना रस नसतो.
शहादा तालुक्यात नुकतीच अशी घटना झाली. डोंगर-टेकड्यांवर जंगलतोड झाली तरी ती झाडे मुळातून नष्ट होत नाहीत. त्यामुळे एक-दोन वर्षें त्या जंगलजमिनींना संरक्षण दिले, की जंगल नव्याने वाढू लागते. दरा विरपूर या गावातील रहिवाशांनी अशाच प्रकारे जंगल राखले होते, गेल्या सहा वर्षांपासून. तेथून कित्येक मैल दूर असलेल्या धडगाव भागातील पावरा आदिवासींनी राखलेल्या त्या जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात केली. माहीतगार असे सांगतात, की यामागे वनकर्मचा-यांचीच प्रेरणा होती. पूर्वी आदिवासी गावांत एकोपा होता; निवडणुकीतील स्पर्धेच्या राजकारणाने, गटबाजीने, धर्मपंथद्वेषाने गावाचे वातावरण दूषित झाले नव्हते. आता मात्र असे घडते. आदिवासी गावांमधला एकोपा कमी होतोय. हितसंबंधी लोक त्याचा फायदा घेत आहेत. परंतु एक आहे, निसर्गाबद्दल आपलेपणा अजूनही आदिवासी स्त्रीपुरुषांत टिकून आहे. वनखात्याच्या मालकीत असलेली सर्व जमीन आदिवासींना केवळ वर्षात एक पावसाळी पीक काढण्यासाठी नाही, तर मोह, चारोळी, चिंच, हिरडा यासारखे मोठे वृक्ष, औषधी गुण असलेली झुडपं आणि पावसाळी एकपिकी शेती अशा प्रकारची मिश्र शेती करण्यासाठी दिली गेली तर सातपुडा काही वर्षांतच हिरवागार दिसू लागेल.
आदिवासींनी त्यांची आदिम संस्कृती टिकवून ठेवावी असे काही जणांना मनापासून वाटते. ते केवळ रोमॅन्टिसिझममधून होते असे वाटत नाही. आदिम संस्कृती विकसित झाली माणसामाणसांतील परस्परावलंबी आणि निसर्गावलंबी सहज संबंधांतून. समुहामध्ये प्रत्येकजण प्रामुख्याने आणि प्राथमिकतेने होता माणूस. तेथे राजा आणि प्रजा, उत्पादक आणि गि-हाईक, मालक आणि मजूर अशा वर्चस्ववादी नात्यांतून आलेले संबंध अस्तित्वातच नव्हते. आदिम संस्कृतीचे आकर्षण आकारते ते माणूस म्हणून. आपण जे हरवले आहे ते त्याच्या धूसर स्मृतीतून. पण संस्कृतीचा संबंध असतो जीवनशैलीशी. जीवनशैली आकारते भोवतालाशी घडणा-या जिवंत संबंधातून. आदिवासीचे भोवताल बदलत आहे, जीवनशैली बदलत आहे. मग आदिम संस्कृती टिकून राहणार कशी?
या काळात एवढेच म्हणता येईल, एका स्थानावरून दुस-या स्थानी स्थलांतरित होणारे विस्थापित आणि एका संस्कृतीतून दुस-या संस्कृतीत स्थित्यंतरित होणारे विस्थापित, दोघांचीही पीडा एकाच प्रकारची आहे. ती पीडा केवळ आदिवासी जमाती नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या परिघावरील सर्वच जाती-जमाती अनुभवत आहेत. नंदुरबार जिल्हा अशा अनेकांतील एक आहे. या दगडाधोंड्यांच्या महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, विंध्य अशा पर्वतरांगांशी नाते सांगणा-या  डोंगरद-यांंतील अनेक क्षेत्रांतील लोकसमूहांचीही हीच पीडा आहे.
                                                  ****धन्यवाद****

No comments:

Post a Comment