माझे शब्दांकन



🚶 *शाळेचा पहिला दिवस चिमुरड्यांविनाच*🚶
      
   आंतरजिल्हा बदलीने स्व- जिल्ह्यात हजर झालो. पण नवीन शाळा मिळायला अपेक्षेपेक्षा उशीर झालाच पण शाळेचा पहिला दिवसही शाळेविनाच काढावा लागेन असे मात्र अपेक्षित नव्हते. असो. पण प्रशासनाच्या पुढे आपल्याला दौड लावणे कठीणच.
        15 तारखेला नाशिकच्या दिशेने निघालो खरा. पण मनात मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी हवीहवीशी वाटणारी लगबग, चिमुरड्यांचा कल्लोळ, नवागतांचे स्वागत, गावातल्या गाठीभेटी या सगळ्यांना मुकल्याची भावना जास्त होती. नोकरी लागल्याची पहिली शाळा म्हणजे नवीन घरच. गावातील सारे घटक म्हणजे कुटुंबियच. जिल्हाबदली नंतर त्या शाळेत आपले कदाचित कधीच जाणे होणार नाही, असा विचार करत काहीतरी राहून गेल्यासारखे आणि सतत चुकल्यासारखं वाटत होतं. प्रवासात मोबाईलला आराम देत जुन्या शाळेतील आठवणी चघळत बसलो. आपसूकच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. विद्यार्थ्यांचे चेहरे आठवून त्यांचा अभ्यास, खोड्या, खेळ, ओरडणे, भांडणे, एकमेकांविषयीच्या तक्रारी सारं काही क्रिकेटच्या हायलाईट सामन्यासारखं डोळ्यासमोरून झपकन सरकलं. आयुष्यातल्या पहिल्या शाळेशी जुळलेली नाळ कशी आयुष्यभर जुळलेली राहत असेल हे प्रकर्षाने जाणवले. 
           शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वांचीच लगबग असते. सरकारी शाळांनी अलीकडेच गुणवत्तेची कात टाकली असताना शाळेचा पहिला दिवस म्हणजे आमचा सर्वांचा सणच. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यालायकच. नवीन पुस्तके, नवीन कपडे, नवीन वर्ग याचा आनंद विद्यार्थीच दशेतच. माझ्या शाळेत संगीत-वाद्यासह होणारा परिपाठ आज आपल्याला ऐकायला मिळाला नाही याची रुखरुख मनात होतीच. त्यातच एका आलेल्या कॉलने मला मोबाईलची आठवण केली आणि तो फोन चक्क माझ्या एका विद्यार्थ्याचा होता. त्या एक-दोन सेकंदातील माझ्या भावना समस्त शिक्षक वर्ग सहज समजू शकतो. माझ्या चिमुकल्यांशी मी व्हिडीओ कॉलने बोलायचे ठरवून सर्वांशी मी मनमोकळेपणाने बोललो. विद्यार्थ्यांच्या भावना, बोबडे बोल ऐकून ८ वर्षांत आपण केलेल्या कमाईची जाणिव झाली. 
येणाऱ्या काळात यापेक्षाही खूप काही कमाई करायचीय, हा निश्चयच.
दिवसभरात नवीन शाळेचा आदेश मिळालातर नाहीच. दिवसभर व्यस्त असूनही चिमुकल्यांविना आपला शाळेचा पहिला दिवस अपूर्णच आहे असे वाटत राहिले.
परतीचा प्रवास सुरू झाला आदेशाविना आणि पहिल्या दिवसाच्या राष्ट्रगीताचे सूर कानावर न पडल्याची खंत घेऊनच.
         - अमोल पाटील.



                             विसरवाडी केंद्रात क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न 
 
          मुलांच्या मैदानावरील क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा तसेच त्यांना खेळांचे फायदे समजून एक व्यासपीठ तयार व्हावे यासाठी क्रीडास्पर्धांच्या आयोजनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विसरवाडी केंद्रातील सर्व १२ शाळांच्या क्रीडास्पर्धा २ टप्प्यात पार पडल्या. विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग, शिक्षकांची संघ जिंकण्याची धडपड, केंद्रप्रमुखांचा प्रेरणादायी वावर, क्रीडास्पर्धांचा थरार समजून घ्यायला पुरेसा आहे, असेच म्हणावे लागेल. पहिल्या टप्प्यात लिंबू चमचा, पोते उडी, संगीत खुर्ची व इतर स्पर्धा पार पडल्या. सर्वच शाळांनी चांगला सराव घेतला असल्यामुळे प्रत्तेक खेळ कमालीचा अटीटीचा होत होता, त्यामुळे पंचांची कसरत, गुणलेखकांची एकाग्रता, प्रेक्षकांचा आवाज यामुळे केंद्रशाळेतील मैदान दणाणले होते. सर्व खेळाडू प्रामाणिकपणे खेळतील, सर्व शिक्षक दिलेली जबाबदारी   प्रामाणिकपणे पार पाडतील याबाबत आधी केंद्रप्रमुख श्री. साळवे सरांनी सूचना दिल्या असल्यामुळे खेळ पारदर्शक  आणि रंगतदार होत होते. यातच एक अलीकडेच दाखल झालेला शाळाबाह्य विद्यार्थ्याला खास संधी देण्यात आली व   त्याचा उत्साह व त्याने केलेले मनोरंजन पाहण्यालायक होते. भविष्यात तो शाळाबाह्य होणार नाही असे सहजच वाटून गेले. दिवस सरते शेवटी शिक्षकांची रंगलेली संगीत खुर्ची शिक्षकांसह विद्यार्थ्यांना विशेष आनंद देवून गेली.
               दुसर्या टप्प्यात कबड्डी व लंगडी या मैदानी खेळांचा थरार पार पडला. यासाठी छत्रपती माध्यमिक विद्यालय, जुनी विसरवाडी यांनी मैदान उपलब्ध करून दिले. यातही सर्व शाळांनी सहभाग नोंदवला व पुन्हा एकदा त्याच आदर्श नियोजनात स्पर्धा पार पडल्या. कबड्डी सामन्यांची विलोभनीय व अटीतटीची दृश्य अजूनही डोळ्यासमोरून जात नाहित. आपला संघ कसा सरस ठरेल व जिंकेल यासाठी खेळाडू व शिक्षक धडपड करताना दिसत होते. कबड्डी खेळात विसरवाडी केंद्रशाळेची सोनिया आणि नवापाडा शाळेचा हेमंत (इंझमाम) यांनी सर्वच उपस्थितांची मने जिंकून घेतली. लंगडी मध्ये कुंभारपाडा विरुद्ध जुनी विसरवाडी हा अंतिम सामना खूपच रंगतदार झाला. 
सर्वच खेळ मुलांना विशेष आनंद देवून गेलेत, खूप काही शिकवून गेलेत हा क्रीडास्पर्धा आयोजनाचा मुख्य उद्देश यशस्वी झाल्याचा केंद्राप्रमुखांसह सर्वच शिक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून व विद्यार्थांचा समारोपापर्यंतचा उत्साह पाहून नक्कीच वाटत होते. शेवटी खेळाचा विजय होणे महत्त्वाचे. आणि तेच ह्या स्पर्धांत झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. केंद्रप्रमुख श्री. साळवे सरांच्या उत्कृष्ट नियोजनाचा हा अजून एक नमुना. वैयक्तिक सांगायचे झाल्यास माझा तर announcement व समालोचन करून घसा बसून गेला. असो.
अशीच घसा बसण्याची संधी वारंवार यावी हीच अपेक्षा.                                                                                 
                                                                                                                                                                                                                                                                                                                                           शब्दांकन -
                                                                                                                                                                                                                                                                                                                             अमोल पाटील
                                                                                                                                         जिल्हा परिषद शाळा कुंभारपाडा, 
 तालुका नवापुर जिल्हा नंदुरबार
                             


*पायाभूत चाचणी शाळा भेट*

     आज दि. 07/09/2017 रोजी खांडबारा केंद्राचे *केंद्रप्रमुख श्री. सुभाषचंद्र एन. पाटील सो.* यांनी जि.प.शाळा, *कुंभारपाडा* येथे भेट  दिली. 
    शालेय आवारात प्रवेश केल्यानंतर निःशब्द शांतता बघून साहेबांच्या चेहऱ्यावर काहीसे प्रश्नचिन्ह दिसले. परंतु पुढच्याच क्षणी साहेबांना वर्गात विद्यार्थी दिसल्याने ते प्रश्नचिन्ह मिटल्यासारखे वाटले. म्हणूनच की काय, साहेबांनी मुले खूप गांभीर्याने चाचणी सोडवतायेत अशी पहिली प्रतिक्रिया दिली. दोन्ही वर्गांत मुलांमध्ये फिरून आल्यावर *मुले चेहऱ्याने खूप उत्साही*  दिसतायेत असे सांगितले. मी ही साहेबांच्या वाक्याला वाक्य जोडत सांगितले की, मुले चेहऱ्यासकट *अभ्यासातही उत्साहीच* आहेत. साहेबांनी हे ऐकल्यावर आपला मोर्चा आपसूकच मुलांकडे वळवला. चौथीच्या एका मुलाला बोलावून त्याच्या चाचणीविषयीच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. रंजित ने दिलेली प्रतिक्रिया, *मला पेपर सोडवायला खूप आवडते पण सर पेपर कधी कधीच घेतात.* साहेब हसलेत आणि मी ही नोंद केली की, *सराव चाचण्या अधिक वाढवाव्या लागणार.* चौथीच्या निताला वाचन करण्यास सांगितले, नीताने  उतारा चांगल्या गतीने वाचला. अभिषेकला साहेबांनी श्रुतलेखनातील शब्द विचारले तर त्याने चक्क *आठ शब्द* न बघता आठऊन सांगितले. साहेबांनी त्याचे विशेष कौतुक केले. 
    एकंदरीत मुलांमध्ये मिसळून गेलेले साहेब आणि साहेबांमध्ये मिसळून गेलेली मुले एकमेकांशी सहजच संवाद करू लागलेत. ह्या अशा अपेक्षित वातावरणाला स्पर्श केल्यावर नैसर्गिक नवऊर्जा प्राप्त होऊन कामाची उमेदही वाढते आणि जबाबदारीही.
   तद्नंतर शालेय वातावरणातील स्वच्छता बघून साहेबांनी सगळ्यांचे कौतुक केले. आमच्यातही मुक्त व प्रगतसाठीचा  संवाद झाला, जो प्रत्येक भेटीदरम्यान पर्यवेक्षीय यंत्रणा व अभिकर्त्यामध्ये व्हावयास हवा.साहेबांनी शेवटी खूप बोलकी मांडणी करत एकच प्रतिक्रिया दिली की, *हे सगळे असेच टिकवून ठेवा.*  यामुळे कर्तव्याची जाणीव अधिकच दृढ झाली.
      असो. अशा भेटींनी ताकद तर मिळतेच शिवाय कर्तव्य जाणीवजागृती होते ती वेगळीच. 
ती सर्वच थरांवर प्रत्येक घटकात होणे आज सरकारी शाळांसाठी नितांत गरजेचे वाटते. 
               *-अमोल पाटील*

            *कुंभारपाडा, नवापूर.*

*कुंभारपाडा येथे जि.प. अध्यक्षांच्या हस्ते मतदान ओळखपत्र वाटप* 
आज दि. 25/1/2018 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद शाळा कुंभारपाडा ता. नवापूर जि. नंदुरबार येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. तसेच आरोग्य खात्यातर्फे ग्रामस्थांना मच्छरदाणी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष्या आदरणीय सौ. रजनीताई नाईक, नवापूर पंचायत समिती सभापती आदरणीय सौ. सविताताई गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे चे चेअरमन श्री. शिरीष दादा नाईक, जि.प. सदस्य श्री. रतन दादा पाडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. हरिश्चंद्र कोकणी, विसरवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. डी.एन. बेडसे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत इयत्ता 3री व 4थी च्या विद्यार्थिनींनी केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गताडी आरोग्य केंद्राचे डॉ. गावीत यांनी केले. 
आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार जि.प. शाळा, कुंभारपाडा व प्राथमिक आरोग्य केंद्र गताडी यांच्या तर्फे करण्यात आला. 
त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही गावकऱ्यांना मच्छरदाणी वाटप करण्यात आल्या. 
शाळेचे शिक्षक श्री. अमोल पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने मतदानाचे महत्व व आपला हक्क पटवून दिला. त्यानंतर काही नवमतदारांना प्रमुख अतिथींच्या हस्ते मतदान ओळखपत्र देण्यात आले.
त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. हरिश्चंद्र कोकणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचे आद्यगुरू राहिलेले केंद्रप्रमुख श्री. बेडसे सरांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पंचायत समितीच्या सभापती सौ. सविताताई गावीत यांनी आपल्या मनोगतात मतदानाचे व शासकीय योजनांचे महत्त्व पटवून दिले. 
जि. प. अध्यक्षा आदरणीय सौ. रजनीताई नाईक यांनी आपल्या मनोगताने सर्व उपस्थितीतांचे मनं जिंकून घेतली. हास्यविनोदाने ताईंनी सर्वांना आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या व हक्क यांची जाणीव करून दिली.
सूत्रसंचालन व आभार श्री. अमोल पाटील यांनी मानले.
त्यांनतर अंगणवाडी भेट देऊन मान्यवरांनी चिमुकल्यांशी संवाद साधला.
जि.प.शाळा, कुंभारपाडा येथिल वर्गांची पाहणी करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी आदरणीय अध्यक्षा व आदरणीय सभापती मॅडम यांनी संवाद केला. विद्यार्थ्यांच्या उत्तरांनी सर्व मान्यवर खूपच समाधानी दिसून आले, असे समजायला *मुले खूप फटाफट आणि बरोबर उत्तरे देतात, असेच टिकवून ठेवा* एवढे मा. अध्यक्षांचे वाक्य भरपुर होते.
मा. अध्यक्षांनी शालेय वातावरणाचे केलेले कौतुक दिवस उत्साहपूर्ण, संस्मरणीय करून गेले.
संपूर्ण कार्यक्रमात मला माझे मित्र श्री. कमलेश पाटील सर व श्री. कोकणी सर नवापाडा यांनी मोलाची मदत केली. 

*अशीच प्रेरणादायी संधी वारंवार मिळो*. 

                  - *अमोल  पाटील*

                 *.जि.प .शाळा,कुंभारपाडा ता.नवापूर जि*. *नंदुरबार*

No comments:

Post a Comment